मुंबई आसपास संक्षिप्त
डोंबिवलीत आगरी महोत्सवाचे आयोजन
डोंबिवली दि.१३ :- आगरी युथ फोरमतर्फे डोंबिवलीत आयोजित केलेल्या १८ व्या आगरी महोत्सवाचे उदघाटन सार्वजनिक बांधकाम मंत्री
मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते झाले. हा महोत्सव डोंबिवलीतील सावळाराम महाराज क्रीडासंकुलात येत्या १९ डिसेंबरपर्यंत दुपारी चार ते रात्री दहा यावेळेत वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. विविध प्रकारची १२५ दालने महोत्सवात आहेत.
महाराष्ट्र फाउंडेशनचे पुरस्कार जाहीर
मुंबई – महाराष्ट्र फाउंडेशन, अमेरिका यांच्या वतीने दिले जाणारे साहित्य आणि समाजकार्य पुरस्कार जाहीर झाले आहेत. ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांना साहित्य जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे, तर डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती पुरस्कार नवी दिल्ली येथील ‘ऑल इंडिया पीपल्स सायन्स नेटवर्क’ला जाहीर झाला आहे. पुरस्काराचे स्वरूप अनुक्रमे दोन लाख रुपये, स्मृतीचिन्ह आणि एक लाख रुपये व स्मृतिचिन्ह असे आहे. पुरस्कारांचे वितरण २८ जानेवारी २०२३ रोजी टिळक स्मारक मंदिरात सायंकाळी पाच वाजता होणार आहे.
गिरणी कामगार संघर्ष समितीचा इशारा
मुंबई – गिरणी कामगारांच्या घरांच्या प्रश्नावर राज्य सरकार चालढकल करत आहे. नागपूर येथे होणाऱ्या विधानसभा अधिवेशनात सरकारने घरांचा प्रश्न सोडविला नाही, तर राज्यभरातील हजारो गिरणी कामगार ‘वर्षा’ बंगल्यावर धडक देतील, असा इशारा गिरणी कामगार संघर्ष समितीने दिला आहे. गिरणी कामगार संघर्ष समितीतर्फे परळ येथील शिरोडकर हायस्कूलमध्ये आयोजित गिरणी कामगारांच्या मेळाव्यात हा निर्णय घेण्यात आला.
ठाणे जिल्ह्यात गोवर लसीकरण मोहीम
ठाणे – जिल्ह्यातील गोवर-रुबेलाचा उद्रेक नियंत्रित करण्यासाठी भिवंडी, कल्याण, अंबरनाथ, मुरबाड व शहापूर या तालुक्यांत तसेच अंबरनाथ व बदलापूर नगरपालिका कार्यक्षेत्रांत दोन टप्प्यांत विशेष गोवर-रुबेला लसीकरण अभियान राबविण्यात येणार आहे. ठाणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत १५ डिसेंबर ते २५ जानेवारी २०२३ या कालावधीत हे अभियान राबविण्यात येणार आहे.
नवी मुंबई मेट्रोसाठी आयसीआयसीआय बँकेकडून पतपुरवठा
नवी मुंबई – नवी मुंबई मेट्रोसाठी सिडको महामंडळ आणि आयसीआयसीआय बँक यांच्यात नुकताच एक करार करण्यात आला. या करारानुसार आयसीआयसीआय बँक नवी मुंबई मेट्रो मार्ग क्र. एक प्रकल्पासाठी सिडकोला ५०० कोटींचा पतपुरवठा करणार आहे.