ठळक बातम्या

यशवंतराव चव्हाण नाट्य संकुलाचे पुनर्निर्माण

नियामक मंडळ, वार्षिक सर्वसाधारण सभेत प्रस्ताव मंजूर

मुंबई दि.१२ :- माटुंगा येथील यशवंतराव चव्हाण नाट्य संकुलाचे पुनर्निर्माण करण्यात येणार आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळ आणि वार्षिक सर्वसाधारण सभेत हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. नाट्य परिषदेचे तहहयात विश्वस्त शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत प्रस्तावाला मान्यता देण्यात आली.

यशवंत नाट्य मंदिराकडे २००५ सालापासून अग्निशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र नसल्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून नाट्यगृहाला कुलूप लागले आहे. तसेच, यशवंत नाट्य मंदिराच्या वास्तुची दुरावस्था झाल्यामुळे ही पूर्ण वास्तू पाडून नव्याने वास्तू बांधावी असा प्रस्ताव नाट्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह शरद पोंक्षे यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवार यांच्याकडे मांडला होता. यशवंत नाट्य संकुलाची वास्तू पाडून तेथे नव्याने बांधण्यात येणाऱ्या वास्तूत तीन नाट्यगृहे बांधण्याचे प्रस्तावित आहे.

बैठकीत नाट्य परिषदेच्या गेल्या तीन वर्षातील(२०१९ ते २०२२) सर्व कामकाजही मंजूर करण्यात आले. नाट्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह शरद पोंक्षे यांच्या पदाचा कालावधी पुढील वर्षी संपत असल्याने नव्याने निवडणूका जाहीर करण्यात याव्यात अशीही मागणी जोर धरत होती. त्यामुळे या बैठकीत २०२३ – २०२८ ह्या कालावधीसाठी निवडणूक घेण्याचा तसेच शंभरावे अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन नवनिर्वाचित नियामक मंडळाच्या नेतृत्वाखाली घेण्यात यावे, असा निर्णयही एकमताने घेण्यात आला. निवडणूक अधिकारी म्हणुन गुरुनाथ दळवी यांची नेमणूक करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *