अनिल देशमुख यांना जामीन मंजूर पण ‘सीबीआय’ च्या मागणीमुळे मुक्तता नाही
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे लक्ष
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ‘ सीबीआय तपास करत असलेल्या भ्रष्टाचार आणि वसुली प्रकरणात जामीन मंजूर करण्यात आला आहे. एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठाने हा जामीन मंजूर केला.
या जामीनाविरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये जाणार असल्याचे ‘सीबीआय’ ने न्यायालयाला सांगितले. त्यासाठी या निर्णयाला दहा दिवसांची स्थगिती द्यावी, अशी मागणी ‘सीबीआय’ने केली. न्यायालयाने हे म्हणणे ऐकून घेऊन या निर्णयाला स्थगिती दिली. त्यामुळे जामीन मंजूर झाला असला तरी देशमुख यांना तुरुंगातून मुक्त केले जाणार नाही.
१०० कोटी वसुली प्रकरणामध्ये देशमुखांवर खोटे आरोप केल्याचा युक्तीवाद देशमुख यांच्या वकिलांनी केला. ‘सीबीआय’च्या मागणीनुसार जामीन मंजूर झाल्याच्या निर्णयाला दहा दिवसांची स्थगिती देण्यात आली असली तरी सर्वोच्च न्यायालयामध्येही उच्च न्यायालयाचा निकाल कायम राहील असा विश्वास व्यक्त केला.
अनिल देशमुख यांच्यावर सध्या जसलोक रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सर्वोच्च न्यायालयामध्ये आता काय निकाल लागतो याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.