‘माझी मुंबई, स्वच्छ मुंबई’ अभियानात ‘आयटीआय’ विद्यार्थ्यांचा सहभाग
मुंबई दि.११ :- मुंबई शहराला स्वच्छ आणि आरोग्यदायी बनविण्याच्या उद्देशाने सध्या राबविण्यात येत असलेल्या ‘माझी मुंबई, स्वच्छ मुंबई’ अभियानात मुंबईतील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या (आयटीआय) शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थी सहभागी झाले होते. शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी स्वच्छता आणि जनजागृती अभियान राबविण्यात आले. मुंबईकरांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी स्वच्छतेची प्रतिज्ञा घेत आपल्या संस्थेबरोबरच शहराला स्वच्छ ठेवण्याचा निर्धार केला.
राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकतामंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून हे अभियान राबविण्यात येत आहे. मुंबई उपनगर जिल्ह्याचे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी प्रदीप दुर्गे यांच्या नेतृत्वाखाली उपनगरातील ‘आयटीआयनी’ या अभियानात सहभाग घेतला. मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ असावीत या उद्देशाने मुलुंड, कुर्ला, गोवंडी, अंधेरी, बोरिवली व चांदिवली येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून उत्साहात हा उपक्रम राबविण्यात आला. या संस्थांनी आपल्या ‘आयटीआय’ परिसराबरोबरच मुलुंड, नाहूर, विद्याविहार, बोरिवली, खार व कुर्ला रेल्वे स्थानकांवर स्वच्छता केली.