ज्येष्ठ पार्श्वगायिका सुलोचना चव्हाण यांचे निधन
‘लावणी गायिका’ म्हणून महाराष्ट्राला ओळख
मुंबई दि.१० :- ज्येष्ठ पार्श्वगायिका सुलोचना चव्हाण यांचे शनिवारी दुपारी मुंबईतील निवासस्थानी निधन झाले. त्या ९२ वर्षांच्या होत्या. प्रसिद्ध ढोलकी वादक विजय हे त्यांचे सुपुत्र. फड सांभाळ तुऱ्याला गं आला, सोळावं वरीस धोक्याचं, पाडाला पिकलाय आंबा,’ ‘मला म्हणत्यात पुण्याची मैना’ यासारख्या एकाहून एक लावण्या सुलोचना चव्हाण यांनी आपल्या दमदार आवाजाने अजरामर केल्या.
सुलोचना चव्हाण यांनी लहानपणी मेळ्यांतून काम केले होते. सुमारे ७० हिंदी चित्रपटांमध्ये के. सुलोचना या नावाने त्यांनी पार्श्वगायन केले होते. सी. रामचंद्र, मन्ना डे, मोहंमद रफी, मुकेश, जोहराबाई, आमीरबाई, शमशाद बेगम आणि त्या काळातील सर्व मान्यवर गायक-गायिकांबरोबर त्यांनी द्वंद्वगीते गायली होती. त्यांची स्वत:ची वैयक्तिक गाणीही त्या वेळी ध्वनिमुद्रित झाली होती. ‘शिवाजी मंदिर नाटय़गृहा’चे उदघाटन सुलोचना चव्हाण यांच्या लावणी गायन कार्यक्रमाने झाले होते. तसेच ‘गेट वे ऑफ इंडिया’ येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या उदघाटनप्रसंगीही त्यांच्या गाण्याचा कार्यक्रम झाला होत्या.
‘रंगल्या रात्री अशा’ चित्रपटातील ‘नाव गाव कशाला पुसता मी आहे कोल्हापूरची, मला हो म्हनत्यात लवंगी मिरची’.या लावणीने ज्यांचे संपूर्ण आयुष्य बदलून गेले आणि आचार्य अत्रे यांनी ज्यांना ‘लावणीसम्राज्ञी’ हा किताब दिला. ही लावणी जगदीश खेबुडकर यांनी लिहिली होती. लावणी आणि सुलोचना चव्हाण असे एक अतूट नाते तयार झाले. त्यांनी गायलेली‘औंदा लगीन करायचं’, ‘कसं काय पाटील बरं हाय का’, ‘कळीदार कपुरी पान’, ‘खेळतांना रंग बाई होळीचा’, ‘पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा’, ‘पाडाला पिकलाय आंबा’, ‘फड सांभाळ गं तुऱ्याला आला’, ‘मी बया पडले भिडची, ग बाई भिडची’, ‘सोळावं वरिस धोक्याचं’ या आणि इतरही अनेक लावण्या आजही लोकप्रिय आहेत.
याच वर्षी त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तेव्हा व्हिलचेअरवर बसूनच त्यांनी पुरस्कार स्वीकारला होता. राज्य शासनाच्या लता मंगेशकर पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले होते. सुलोचना चव्हाण यांच्या पार्थिवावर चंदनवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.