हायड्रोजनवरील वाहनांच्या प्रकल्पासाठी महाराष्ट्रात पहिली गुंतवणूक होणार
मुंबई दि.०८ :- हायड्रोजनवर चालणाऱ्या वाहनांच्या प्रकल्पासाठी राज्यात मोठी गुंतवणूक होणार असून हा प्रकल्प सुरु करण्यासाठी अमेरिकास्थित ट्रिटॉन इलेक्ट्रिक व्हेईकल्स कंपनीशी सकारात्मक चर्चा झाली आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. अमेरिकेच्या ट्रिटॉन इलेक्ट्रिक व्हेईकल्सचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी हिमांशू पटेल यांनी गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ‘वर्षा’ निवासस्थानी भेट घेतली.
उद्योगमंत्री उदय सामंत यावेळी उपस्थित होते. महाराष्ट्रात हायड्रोजन प्रकल्प आणि हायड्रोजनवर चालणाऱ्या वाहनांचे निर्मिती केंद्र सुरु करण्यासाठी ट्रिटॉन कंपनीने पुढाकार घेतला असून त्यासाठी पटेल यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. जानेवारी २०२३ मध्ये दावोसमध्ये होणाऱ्या परिषदेत यासंबंधीचा सामंजस्य करार करण्यात येणार असून या कंपनीला महाराष्ट्रात उद्योग सुरु करण्यासाठी सर्व आवश्यक त्या सुविधा राज्य सरकारकडून पुरविल्या जातील.
राज्यात हायड्रोजनवर आधारित वाहनांचा प्रकल्प सुरू झाल्यानंतर अशा प्रकारचा प्रकल्प सुरु करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. ट्रिटॉन कंपनी जानेवारी २०२३ मध्ये दावोसमध्ये होणाऱ्या परिषदेत महाराष्ट्राबरोबर सामंजस्य करार करणार असून या कंपनीला महाराष्ट्रात उद्योग सुरु करण्यासाठी पुणे, ऑरिक (औरंगाबाद), नागपूर, असे विविध पर्याय उपलब्ध असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.