पहिले ‘सीडीएस’ जनरल बिपीन रावत यांना अभिवादन
शिक्षक भरती करताना माजी सैनिक आणि वीरपत्नींना प्राधान्य शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर
मुंबई दि.०९ :- देशाची एकता आणि अखंडता कायम राखण्यासाठी सैनिकांचे योगदान महत्वपूर्ण आहे. त्याचप्रमाणे देशासाठी बलिदान देणाऱ्या सैनिकांच्या वीरपत्नीही दु:ख सहन करुन सामाजिक कार्यात अग्रस्थानी राहतात. शिक्षक, शारीरिक प्रशिक्षण शिक्षक तसेच शिक्षण सेवक पदांची भरती करताना माजी सैनिक आणि वीरपत्नींचा प्राधान्याने विचार करण्यात येईल, असे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.
भारताचे पहिले सीडीएस (कम्बाईंड डिफेन्स सर्व्हिसेस) बिपीन रावत यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त मंत्रालयात आयोजित अभिवादन कार्यक्रमात केसरकर बोलत होते. निवृत्ती यादव या महाराष्ट्राच्या सुपुत्राने उत्तराखंड मधील बिपीन रावत यांचे ‘सैणा’ गाव दत्तक घेऊन तेथे पायाभूत सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत, याबद्दल त्यांचे केसरकर यांनी कौतुक केले. या कार्याच्या वर्षपूर्तीनिमित्त ‘किरणपूंज’ या अहवाल पुस्तिकेचे प्रकाशनही यावेळी केसरकर यांच्या हस्ते झाले. सर जेजे महानगर रक्तपेढीतर्फे यावेळी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
रावत यांचे बंधु देवेंद्र सिंह रावत, सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत, सैनिक फेडरेशनचे मुंबई अध्यक्ष फ्लेचर पटेल, डॉ.हरिवंशराय बच्चन प्रबोधन प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आणि कार्यक्रमाचे आयोजन निवृत्ती यादव, महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती महासंघाचे अध्यक्ष भारत वानखेडे तसेच माजी सैनिक आणि त्यांचे कुटुंबिय आदी यावेळी उपस्थित होते.