वृत्तांकनात निर्भीडता असावी; खोडसाळपणा नसावा – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे प्रतिपादन
मुंबई दि.०९ :- वृत्तांकन करताना सच्चाई असावी, निर्भीडता असावी, राष्ट्रभाव असावा परंतु खोडसाळपणा नसावा असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बुधवारी येथे केले. व्हॉइस ऑफ मिडिया’ या प्रसार माध्यम प्रतिनिधींच्या देशव्यापी संघटनेच्या संकेतस्थळाचे उदघाटन तसेच पदाधिकाऱ्यांचे पदग्रहण राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत राजभवन येथे झाले, त्यावेळी ते बोलत होते.
पत्रकारांनी मूल्याधिष्टित पत्रकारिता करावी तसेच शाश्वत जीवनमूल्ये जोपासावी, अशी अपेक्षावजा सूचना करून राज्यपाल कोश्यारी म्हणाले, पत्रकारिता करणे म्हणजे धारदार शस्त्रावर चालण्यासारखे कठीण काम आहे. आज डिजिटल माध्यमे व समाज माध्यमे आल्यामुळे माध्यमांचा सदुपयोग तसेच दुरुपयोग देखील होताना दिसतो.
व्हॉइस ऑफ मिडिया ही संघटना २१ राज्यात पसरली असून १८ हजार माध्यमप्रतिनिधी संस्थेशी जोडले गेले असल्याचे संस्थापक संदीप काळे यांनी सांगितले. संस्थेची केवळ संख्यात्मक वाढ न करता संस्थेच्या माध्यमातून सक्षम व सकारात्मक दृष्टिकोन ठेवून मल्टीमिडीया मध्ये काम करणारी पत्रकारांची चांगली पिढी घडविण्याचा प्रयत्न केला जाईल असे संघटनेचे राज्य अध्यक्ष राजा माने यांनी सांगितले.