‘चतुरंग प्रतिष्ठान’चा जीवनगौरव’ पुरस्कार दुर्ग संशोधक आप्पा परब यांना जाहीर
डोंबिवलीत होणा-या रंगसंमेलनात पुरस्कार प्रदान
मुंबई दि.०५ :- चतुरंग प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणाऱ्या जीवनगौरव पुरस्कारासाठी दुर्ग संशोधक, इतिहास अभ्यासक बाळकृष्ण तथा आप्पा परब यांची निवड करण्यात आली आहे. सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि तीन लाख रुपये असे पुरस्काराचे स्वरुप आहे. येत्या १८ डिसेंबर रोजी डोंबिवलीत सावित्रीबाई फुले रंगमंदिरात होणाऱ्या चतुरंगच्या ३२ व्या रंगसंमेलनात ज्येष्ठ सनदी पोलीस अधिकारी सदानंद दाते यांच्या हस्ते हा पुरस्कार आप्पा परब यांना प्रदान करण्यात येणार आहे.
या रंगसंमेलनाचे स्वागताध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार डाॅ. उदय निरगुडकर असून डोंबिवलीतील श्री गणेश मंदिर संस्थानचे विश्वस्त प्रवीण दुधे यांच्या हस्ते रंगसंमेलनाचे उदघाटन होणार आहे. रंगसंमेलनाच्या निमित्ताने लोकवाद्यांचा नादघोष करणारा ‘लोकनाद’ हा कार्यक्रम होणार असून कार्यक्रमात सत्यजीत तळवलकर, श्रीधर पार्थसारथी, कृष्णा साळुंके, नवीन शर्मा, तन्मय देवचक्के हे आघाडीचे वाद्य कलावंत सहभागी होणार आहेत.
चतुरंग प्रतिष्ठान’चा जीवनगौरव’ पुरस्कार दुर्ग संशोधक आप्पा परब यांना
गायिका मंजुषा कुलकर्णी-पाटील, बासरी वादक अमर ओक ‘स्वर टीपेचा-चांदण्यांचा’ हा कार्यक्रम सादर करणार असून दुपारी ४ ते १० या वेळेत रंगसंमेलन होणार आहे. रंगसंमेलनाच्या सशुल्क प्रवेशिका येत्या १ डिसेंबरपासून दुपारी चार ते आठ वेळेत चतुरंग कार्यालय, श्रीकृष्ण निवास, टिळकनगर शाळेसमोर, टिळकनगर, डोंबिवली (पूर्व) तसेच पै फ्रेंड्स लायब्ररी, गजानन महाराज उपासना केंद्रासमोर, भगतसिंह पथ, डोंबिवली (पूर्व) येथे उपलब्ध असतील.
जीवनगौरव निवड समितीचे अध्यक्ष डाॅ. विनय सहस्त्रबुध्दे, ज्येष्ठ पत्रकार सुधीर जोगळेकर, कंपनी सल्लागार माधव जोशी, ज्येष्ठ चित्रकार वासुदेव कामत, ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडे, ज्येष्ठ पत्रकार विनायक परब आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत.