स्वच्छ, सुंदर ठाण्यासाठी सर्वांनी काम करावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन
ठाणे दि.०३ :- स्वच्छ आणि सुंदर ठाणे साकारण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांनी ‘माझे ठाणे’ ही भावना मनात ठेवून ठाण्याच्या विकासासाठी उत्कृष्ट दर्जाचे काम करावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी येथे केले. ठाणे महानगरपालिकेच्या विविध उपक्रमांचा आढावा घेण्यासाठी महापालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.
ठाणे महानगरपालिकेच्या ‘मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे’ या उपक्रमाचा शुभारंभही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यावेळी करण्यात आला. दादोजी कोंडदेव स्टेडियमच्या नुतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले असून वाड्यापाड्याचे टुमदार जुने ठाणे विकसित होत आहे. ठाण्यात भविष्याच्या दृष्टीने नवनवीन बदल होत आहेत, असेही मुख्यमंत्री म्हणाले. महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी ‘मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे उपक्रम’ आणि महापालिकेच्या वतीने सुरू असलेल्या विविध विकास कामांची माहिती दिली.