विस्तारीत म्हैसाळ उपसा सिंचन योजनेसाठी युद्ध पातळीवर कार्यवाही करा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश
जत तालुक्यातील ४२ गावांच्या पाणी योजनांसाठी निधी उपलब्धतेची ग्वाही
मुंबई दि.०३ :- जत तालुक्यातील गावांसाठी महत्वाची विस्तारीत म्हैसाळ उपसा सिंचन योजना पूर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर प्रय़त्न करा, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी येथे दिले. सीमा भागातील या गावांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक त्या आरोग्य, शिक्षण, वीज तसेच पायाभूत सुविधा यासाठी संबंधित विभागांनी समन्वय राखून कार्यवाही करावी अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.
हेही वाचा :- पं. कुमार गंधर्व यांच्या जन्मशताब्दीनिमित्त संपूर्ण राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन
सह्याद्री राज्य अतिथीगृहात जत तालुक्यातील या गावांच्या विविध प्रश्नांविषयी आयोजित बैठकीत मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. सांगलीचे जिल्हाधिकारी एम. राजा दयानिधी, सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यावेळी उपस्थित होते. जत, आटपाडी, कवठेमहांकाळ आणि तासगांव या तालुक्यात द्राक्ष आणि डाळींबाच्या बागांचा सिंचन हा महत्वाचा मुद्दा आहे. या बागांना दिवसा पाणी देता यावे यासाठी भारनियमनाच्या वेळांमध्ये सवलत देण्यासाठी एमईआरसी आणि विविध यंत्रणांनी विशेष बाब सकारात्मक पावले उचलण्याचे निर्देशही देण्यात आले.