‘जी २० परिषदे’ च्या महाराष्ट्रात १४ बैठका होणार
मुंबई दि.०३ :- भारताला जी २० परिषदेचे अध्यक्षपद मिळाले ही अतिशय गौरवशाली बाब असून महाराष्ट्रात या परिषदेच्या १४ बैठका होणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी येथे दिली. जी २० परिषदेनिमित्त महाराष्ट्रात होणाऱ्या बैठकांच्या तयारीचा आढावा मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला.
हेही वाचा :- महापरिनिर्वाण दिन चैत्यभूमीवर येणाऱ्या अनुयायांसाठी महापालिकेतर्फे विविध सेवा-सुविधा
सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या बैठकीस पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्यासह विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव उपस्थित होते. परिषदेच्या १६१ बैठका भारतात होणार असून त्यापैकी १४ बैठका महाराष्ट्रात मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर या महानगरांमध्ये होणार आहेत.
हेही वाचा :- विस्तारीत म्हैसाळ उपसा सिंचन योजनेसाठी युद्ध पातळीवर कार्यवाही करा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश
परिषदांच्या बैठक काळात राज्यात होणारे विविध कार्यक्रम आणि त्यांच्या तयारीबाबत मुख्य सचिव श्रीवास्तव यांनी सादरीकरण केले. बृहन्मुंबई महापालिका आयुक्त आय. ए. चहल यांनी मुंबईत सुरू असलेल्या तयारीची तर पुणे, औरंगाबाद आणि नागपूर विभागीय आयुक्तांनी तिथे सुरू असलेल्या नियोजनाची माहिती दिली.