‘कुलाबा वांद्रे सिप्झ’ मेट्रोच्या भुयारीकरणाचा ४२ वा टप्पा पूर्ण
महालक्ष्मी मेट्रो स्थानक ते मुंबई सेंट्रल मेट्रो स्थानक
मुंबई दि.०१ :- मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या (एमएमआरसी) कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-३ मार्गिकेतील भुयारीकरणाचा ४२ वा टप्पा बुधवारी पूर्ण झाला. तानसा १ नावाच्या टीबीएमने ४३ दिवसांत हा टप्पा पूर्ण केला. महालक्ष्मी मेट्रो स्थानक ते मुंबई सेंट्रल मेट्रो स्थानकापर्यंतचा ८३७ मीटरचा हा ४२ वा टप्पा आहे.
मेट्रो ३ प्रकल्प ३३.५ किलोमीटरचा असून यात एकूण ५५ किलोमीटरचे (येणारा-जाणारा मार्ग) भुयारीकरण करण्याचे आव्हान एमएमआरसीसमोर होते. हे आव्हान पेलण्यासाठी एमएमआरसीने अत्याधुनिक अशा टनेल बोिरग मशीन तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार १७ टीबीएम मशीनचा वापर करण्यात आला आहे. २०१७ पासून एक एक करत १७ टीबीएम मशीन भूगर्भात सोडण्यात आले.
भूगर्भातील ५५ किमीचे काम अखेर पाच वर्षांत या टीबीएमने यशस्वीपणे पूर्ण केले आहे. पहिले टीबीएम मशीन भुयारीकरण पूर्ण करून सप्टेंबर २०१८ मध्ये बाहेर आले. भुयारीकरणाचे ४२ टप्पे निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार बुधवारी भुयारीकरणाचा शेवटचा ४२ वा टप्पा यशस्वीपणे पूर्ण करण्यात आला आहे.