मुंबई आसपास संक्षिप्त
पंतप्रधान योजनेतील घरकुलांना एक हजार रुपये मुद्रांक शुल्क
मुंबई दि.३० :- पंतप्रधान आवास योजनेतील घरकुलांना आता फक्त एक हजार रुपये इतके मुद्रांक शुल्क आकारण्यात येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आर्थिक दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गटातील निवासी सदनिकांसाठी ही सवलत देण्यात येणार आहे.
तुकाराम मुंढे यांची बदली
मुंबई – राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक आणि कुटुंब कल्याण आयुक्त तुकाराम मुंढे यांची दोन महिन्यातच संचालक पदावरून बदली करण्यात आली. मुंडे हे २००५ च्या तुकडीचे सनदी अधिकारी असून सतरा वर्षाच्या काळात त्यांची १९ वेळा बदली झाली आहे.
मुंबई उच्च न्यायालयात दोन न्यायमूर्तींची नियुक्ती
मुंबई – केंद्र सरकारच्या विधि आणि न्याय मंत्रालयाने राष्ट्रपतींच्या संमतीने मुंबई उच्च न्यायालयातील दोन न्यायमूर्तींच्या नियुक्तीची अधिसूचना जारी केली. संतोष चपळगावकर, मिलिंद साठ्ये हे दोन न्यायमूर्ती असतील.
गोवर रोगामुळे आत्तापर्यंत १४ बालकांचा मृत्यू
मुंबई – गोवर रोगामुळे राज्यात आतापर्यंत १४ बालकांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या बालकांपैकी तेरा बालकांना गोवर प्रतिबंधक लस देण्यात आली नव्हती अशी माहिती समोर आली आहे. मुंबईत दहा, भिवंडी महापालिका क्षेत्रात तीन, वसई विरार महापालिका क्षेत्रात एक अशा एकूण १४ बालकांचा गोवरने मृत्यू झाला आहे.
सहकारी संस्थांच्या निवडणुकांना मुदतवाढ
मुंबई – राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांना मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका होईपर्यंत या निवडणुका घेण्यात येणार नाहीत. या सहकारी संस्थांना येत्या २० डिसेंबर २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.