ठळक बातम्या

आपत्ती व्यवस्थापनाची ‘भूकंप’ विषयक रंगीत तालीम

विविध यंत्रणांसह ३०० जणांचा सहभाग
अत्याधुनिक सामुग्रीचा वापर

मुंबई दि.३० :- बृहन्मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागातर्फे मंगळवारी ‘भूकंप विषयक’ रंगीत तालीम आयोजित करण्यात आली होती. या सरावात विविध दहा यंत्रणांचे सुमारे ३०० कर्मचारी, अधिकारी सहभागी झाले होते.

बृहन्मुंबई महानगरपालिकेचे मुंबई अग्निशमन दल, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक (NDRF), मुंबई पोलीस, बृहन्मुंबई महानगरपालिकेचा ‘ए’ विभाग, नागरी संरक्षण दल, ‘१०८’ रुग्णवाहिका सेवा आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेचे बा. य. ल. नायर सर्वोपचार रुग्णालय यांचा यात सहभाग होता.

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळील मुख्य टपाल कार्यालयाच्या बृहन्मुंबई महापालिकेच्या मनोहरदास स्ट्रीट महानगरपालिका शाळेत ही रंगीत तालीम घेण्यात आली. शाळेतील ६४ विद्यार्थी,१८ शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी अशा ८२ व्यक्तिंना इमारतीतून सुखरुपपणे बाहेर काढण्यात आले. या रंगीत तालमीत ढिगा-याखाली अडकलेल्या माणसांना ढिगा-याखालून सुखरूप बाहेर काढण्याचे प्रात्यक्षिकही सादर करण्यात आले.

महापालिकेचे सहआयुक्त (सामान्य प्रशासन) मिलिन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली भूकंप विषयक रंगीत तालमीचे प्रात्यक्षिक करण्यात आले असल्याची माहिती संचालक (आपत्कालीन व्यवस्थापन) महेश नार्वेकर यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *