मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर उद्यापासून २४ तास सुरक्षा
मुंबई दि.३० :- मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वारंवार होणारे अपघात टाळण्यासाठी येत्या १ डिसेंबरपासून पुढील सहा महिने द्रुतगती महामार्गावरील दोन्ही मार्गिकांवर २४ तास सुरक्षा तैनात करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित विभागांना तसे आदेश दिले आहेत.
मोटार वाहन विभागातील मुंबई,पुणे,पनवेल,पिंपरी-चिंचवड या प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिका-यांच्या १२ पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. या पथकांमध्ये ३० अधिका-यांची नियुक्ती करण्यात आली असून यापैकी प्रत्येकी ६ पथके आणि १५ अधिकारी दोन्ही महामार्गांवर २४ तास सुरक्षा पुरविणार आहेत.
परिवहन विभाग विविध उपक्रम राबविणार असून यात अपघातग्रस्त ठिकाणांसोबतच अपघात प्रवण ठिकाणांचे सर्वेक्षण, रस्त्यावर अवैधरित्या पार्किंग करणा-यांवर, इंटरसेप्टर वाहनांच्या माध्यमातून अतिजलद वाहनांवर आणि मार्गिकेची शिस्त न पाळणा-यांवर कारवाई करणे, सीटबेल्ट न वापरणा-या वाहनचालक आणि प्रवाशांना दंड याचा समावेश आहे.