‘सिनार्मस’ची महाराष्ट्रात २० हजार कोटींची गुंतवणूक
मुंबई दि.३० :- महाराष्ट्रात उद्योगांसाठी पोषक वातावरण असून अधिकाधिक उद्योगांनी महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी पुढे यावे, त्यांना सर्व आवश्यक त्या सुविधा पुरविल्या जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी येथे दिली. इंडोनेशियास्थित मे. सिनार्मस पल्प ॲण्ड पेपर कंपनीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रायगड जिल्ह्यातील धेरंड येथे २८७ हेक्टर जमिनीचे वाटप पत्र प्रदान करण्यात आले, त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.
राज्यात गेल्या अडीच वर्षातील सर्व प्रलंबित प्रस्तावांवर कार्यवाही करण्यात येत असून महाराष्ट्रात गुंतवणूक करणाऱ्या उद्योगांच्या पाठीशी शासन आहे, त्यांना सर्व आवश्यक त्या सुविधा पुरविल्या जातील, असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
सिनार्मस पल्प ॲण्ड पेपर प्रा. लि. हा आशियातील सर्वात मोठा कागद निर्मिती क्षेत्रातील उद्योग आहे. इंडोनेशियातील हा समूह भारतात पहिल्यांदाच आणि महाराष्ट्रात प्रकल्प उभारणार आहे. पहिल्या टप्प्यात दहा हजार कोटी तर दुसऱ्या टप्प्यात अतिरिक्त दहा हजार कोटींची गुंतवणूक करण्यात येणार असून याद्वारे प्रत्यक्ष-प्रत्यक्ष सात हजार रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.