फॅशन स्ट्रीट, बाणगंगा, भायखळा आदी ठिकाणी सायंकाळनंतर खाद्यपदार्थ उपलब्ध करून देणार
मुंबई शहर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ४५० कोटींच्या प्रारूप आराखड्यास मंजुरी
मुंबई दि.२९ :- मुंबईतील फॅशन स्ट्रीट, भेंडीबाजार, बाणगंगा, भायखळा आदी ठिकाणी सायंकाळनंतर खाद्यपदार्थ मिळण्याची व्यवस्था करण्याचा मानस असल्याची माहिती मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सोमवारी येथे दिली. मुंबई शहर जिल्ह्याच्या २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठीच्या जिल्हा वार्षिक योजनेच्या (सर्वसाधारण) ४५९ कोटी रूपयांच्या प्रारूप आराखड्यास जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
मुंबईच्या वैभवात अधिक भर घालून त्याला नवीन झळाळी देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. रूग्णालयांमध्ये अधिक सुविधा, कोळीवाड्यांचा पर्यटनदृष्ट्या विकास, पोलीस वसाहतींची दुरूस्ती, कामगार कल्याण केंद्राच्या मैदानाला आधुनिक स्वरूप देणे आदींवर भर देण्यात येणार आहे. शाळांमध्ये व्यावसायिक शिक्षण देण्यासाठी लवकरच सामंजस्य करार करण्यात येणार आहे. याअनुषंगाने जिल्हा नियोजन समितीच्या आराखड्यात लोकप्रतिनिधींच्या सूचनांचा समावेश करण्यात येईल, असेही केसरकर यांनी सांगितले.
मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहूल नार्वेकर, राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार अरविंद सावंत, बृहन्मुंबई महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल, जिल्हाधिकारी राजीव निवतकर, जिल्हा नियोजन अधिकारी जी.बी.सुपेकर, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.