बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या दहा प्रभागात उद्या पाणीकपात
काही ठिकाणी पाणीपुरवठा बंद, कमी दाबाने पाणीपुरवठा
मुंबई दि.२८ :- काही अत्यावश्यक आणि महत्त्वाच्या दुरुस्ती कामांमुळे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या दहा प्रभागात उद्या (२९ नोव्हेंबर) एक दिवसाची पाणीकपात केली जाणार आहे. या पाणीकपातीमुळे काही प्रभागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे तर काही प्रभागात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.
के पूर्व प्रभागात अंधेरी पूर्व, एमआयडीसी, सिप्झ, जोगेश्वरी पूर्व आणि इतर उपनगरांचा प्रमुख भागांचा यात समावेश आहे. गुंदवली, नेहरू नगर आणि आझाद नगर भागात २९ नोव्हेंबरला पाणीकपात होणार आहे. आनंद नगर, समर्थ नगर आणि शेर-ए-पंजाब भागात ३० नोव्हेंबरला पाणी पुरवठ्यात कपात होणार आहे. मात्र, उर्वरित भागात कमी दाबाने पाणी पुरवठा केला जाणार आहे.
ओशिवरा, लोखंडवाला, विलेपार्ले पश्चिम, अंधेरी पश्चिम आणि जुहू मेट्रो भागात २९ आणि ३० नोव्हेंबरला पाणीटंचाई जाणवणार आहे. नागरिकांनी पाणी जपून वापरावे तसेच पाणीसाठा करून ठेवावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.