कलाश्रमच्या ‘अभियान सन्मान’ सोहळ्यास संगीतकार आप्पा वढावकर यांची उपस्थिती
(मुंबई आसपास प्रतिनिधी)
मुंबई दि.२८ :- स्वातंत्रसैनिक डॉ.परशुराम पाटील कला केंद्राच्या ‘कलाश्रम’ संस्थेतर्फे येत्या ३० नोव्हेंबर रोजी ‘अभियान सन्मान’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यास संगीतकार, संगीत संयोजक आप्पा वढावकर प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम संध्याकाळी सात वाजता पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, रवींद्र नाट्य मंदिर, तिसरा मजला, आर्वाना हॉल, प्रभादेवी येथे होणार आहे.
चित्रपट समीक्षक शंकरराव संकपाळ, अभिनेते, दिग्दर्शक सुरेश गावडे, आदर्श शिक्षिका शालिनी भाबल, चित्रकार आणि टॉनिक अंकाचे संपादक कृष्णा मानकर या दिवंगतांच्या नावाचे ‘दखलपत्र’ चित्रपट समीक्षक संतोष मोरे, लेखक-दिग्दर्शक विजय पाटणकर, आदर्श शिक्षिका पौर्णिमा माने, ज्येष्ठ चित्रकार विनायक गोडकर यांना प्रदान करण्यात येणार आहे. ‘दखलपत्र’ प्रदान करण्याचा हा ५३ वा कार्यक्रम आहे.
लेखक, समिक्षक रमेश उदारे यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने ‘मधूर भाव नाट्य’ ही स्पर्धा घेण्यात आली होती. त्याचा पारितोषिक वितरण समारंभही यावेळी होणार आहे. अभिनेते, नृत्य दिग्दर्शक सचिन गजमल दिवंगत कवी शाहीर अनंत फंदी यांच्या गीतांवर नृत्य सादर करून त्यांना आदरांजली वाहणार आहेत. हा कार्यक्रम विनामूल्य असून संस्थेचे सभासद, सदस्य आणि निमंत्रित पाहुणे यांनाच प्रवेश दिला जाणार आहे.