कल्याण गायन समाजाचा २१ वा देवगंधर्व महोत्सव
अत्रे रंगमंदिरात १० आणि ११ डिसेंबरला आयोजन
कल्याण दि.२८ :- कल्याण गायन समाज संस्थेतर्फे येत्या १० आणि ११ डिसेंबर रोजी आचार्य अत्रे रंगमंदिरात २१ व्या देवगंधर्व महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवासाठी सशुल्क प्रवेश आहे. शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार या उद्देशाने ९७ वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या या संस्थेतर्फे दरवर्षी देवगंधर्व महोत्सवाचे आयोजन केले जाते.
पहिल्या दिवसाच्या सत्राची सुरुवात मंजुषा पाटील यांच्या शास्त्रीय गायनाने होणार आहे. दुसऱ्या सत्रात सुप्रसिद्ध तबला वादक पद्मश्री विजय घाटे यांच्या संकल्पनेतून साकार झालेला ‘मधूर ताल’ हा कार्यक्रम सादर होणार आहे. शेवटच्या सत्रात आनंद भाटे यांचे गायन होणार आहे. दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्राची सुरुवात गौरी पाठारे यांच्या गायनाने होणार असून दुसऱ्या सत्रात आघाडीचे बासरी वादक प्रवीण गोडखिंडी यांचे बासरी वादन होणार आहे. सत्यजीत तळवलकर त्यांना तबला साथ करणार आहेत.
गेली दोन वर्ष करोना काळात संस्थेतर्फे सर्व नियमांचे पालन करून हा महोत्सव रसिकांसाठी विनामूल्य सादर केला गेला. यंदा महोत्सवास सशुल्क प्रवेश आहे. महोत्सवात ‘रियाझ’ या विषयावरील स्मरणिकेचे प्रकाशन ११ तारखेला होणार आहे. दरम्यान या महोत्सवात आत्तापर्यंत उस्ताद झाकीर हुसेन, पंडित हरिप्रसाद चौरसिया, उस्ताद राशिद खान, नीलाद्री कुमार, कौशिकी चक्रवर्ती, डॉ एल सुब्रमण्यम, हरिहरन, सुरेश वाडकर हे दिग्गज सहभागी झाले होते.