नुसता नट्टापट्टा नको तर मनापासून आणि कामाचा आनंद घेऊन काम करा
ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांचा सल्ला
(मुंबई आसपास प्रतिनिधी)
मुंबई दि.२६ :- नुसता नट्टापट्टा करू नका. मला काय करायचाय ते आधी लक्षात घ्या. माझे काम काय? या भूमिकेत माझे वय काय? हे समजून, कामाचा आनंद घेऊन प्रामाणिकपणे, श्रद्धेने काम करा, असा सल्ला ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी परळ येथे दिला. जागतिक रंगकर्मी दिनाच्या निमित्ताने मराठी नाट्य कलाकार संघातर्फे दामोदर नाट्यगृहात आयोजित कार्यक्रमात उषा नाडकर्णी यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यानंतर स्मिता गवाणकर यांनी त्यांची प्रकट मुलाखत घेतली.
आपल्या भाषेवर प्रेम करा. भाषेच्या बाराखडीचा सराव करा. शब्दरचना, शब्दांचे उच्चार, वाक्याची रचना समजून घ्या. म्हणजे तुमच्या चांगल्या कामाबरोबरच तुमचे बोलणे देखील लोकांना आवडेल आणि मग प्रेक्षक तुमचे कौतुक करतील, असा कानमंत्रही नाडकर्णी यांनी नवोदित कलाकारांना दिला. मराठी नाट्य कलाकार संघाच्यावतीने यावेळी १४ ज्येष्ठ कलाकारांना ‘कलाकार आर्थिक सहाय्य योजने’ अंतर्गत धनादेशाचे वाटप करण्यात आले. मराठी नाट्य कलाकार संघाचे अध्यक्ष सुशांत शेलार, उपाध्यक्ष शरद पोक्षे यांनीही मनोगत व्यक्त केले.
रंगभूमीवर प्रामाणिक प्रेम करणाऱ्या सक्रिय रंगकर्मींचाही हक्काचा एक दिवस असावा, या उद्दिष्टाने ज्यांनी रंगभूमीवर सर्वस्व वाहिले आहे, अशा भालचंद्र पेंढारकर यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून २५ नोव्हेंबर हा ‘जागतिक रंगकर्मी दिन’ म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने एका ज्येष्ठ आणि श्रेष्ठ रंगकर्मींचा सत्कार करून त्यांच्या कार्याला मानवंदना देण्यात येते.