सोयाबीन-कापसाचा बाजारभाव स्थिर राहण्यासाठी केंद्राशी चर्चा करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
मुंबई दि.२५ :- सोयाबीन-कापूस पिकाच्या बाजारभावातील चढ-उतारामुळे शेतक-यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यासंदर्भातील धोरणात बदल करण्यासाठी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याशी चर्चा करणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतक-यांच्या शिष्टमंडळाला दिले.
कापूस उत्पादकांच्या केंद्र व राज्य सरकारशी संबंधित मागण्यांसंदर्भात शेतक-यांनी पुकारलेल्या आंदोलनाची दखल घेऊन मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी गुरुवारी सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक घेतली. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी वरील आश्वासन दिले. यावेळी कृषी मंत्री अब्दुल सत्तार, सहकार मंत्री अतुल सावे, कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव अनुपकुमार यादव यांच्यासह शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते.
दुष्काळ कालावधीत नुकसानग्रस्त शेतक-यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी शासनाने ७ हजार कोटी रूपये वितरीत केले असून, १० हजार कोटीपर्यंत सहाय्य करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. गोपीनाथ मुंडे पीक विमा योजनेअंतर्गत शेतमजुराला विमा संरक्षण देता येईल का यासंदर्भात अहवाल सादर करण्याचे निर्देशही त्यांनी अधिका-यांना दिले. शासनाने दिलेले शेतक-यांसाठीचे अनुदान परस्पर कर्ज खात्यात वळविल्यास संबंधित अधिका-यांवरही कारवाई करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.