शैक्षणिक

विद्यापीठांनी आत्मनिर्भरतेचा संकल्प करावा – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे आवाहन

(मुंबई आसपास प्रतिनिधी)

मुंबई दि.२५ :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘आत्मनिर्भर भारत’ ही संकल्पना मांडून भारताला सशक्त करण्यासाठी मोठे अभियान हाती घेतले आहे. प्रत्येक विद्यार्थी आत्मनिर्भर झाला तर देश आत्मनिर्भर होईल म्हणून या अभियानाला चालना देण्यासाठी विद्यापीठांनी आत्मनिर्भर विद्यापीठ होण्याचा संकल्प करावा, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या संयुक्त मंडळाची बैठक गुरुवारी राज्यपाल कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली राजभवन येथे झाली. त्यावेळी राज्यपाल कोश्यारी बोलत होते. बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, तंत्र शिक्षण संचालक डॉ. अभय वाघ, उच्च शिक्षण संचालक डॉ.शैलेंद्र देवळाणकर सर्व विद्यापींठाचे कुलगुरू उपस्थित होते.

विद्यापीठात होणारे संशोधन, शैक्षणिक उपक्रम, नावीन्यपूर्ण शिक्षण यावर शिक्षणाचा दर्जा अवलंबून असतो. म्हणून कुलगुरू विद्यार्थ्यांचे खऱ्या अर्थाने पालक असतात, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले तर उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले,विद्यापीठांनी शैक्षणिक गुणवत्ता आणि सुलभता याकडे विशेष लक्ष द्यावे.उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी, येत्या शैक्षणिक वर्षांपासून विद्यापीठांनी चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम सुरु करावा, अशी सूचना केली.

तर विद्यापीठांनी कौशल्य अभ्यासक्रम तयार करावेत, असे आवाहन कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले. बैठकीत उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रस्तोगी यांनी नवीन शैक्षणिक धोरण अंमलबजावणीबाबत तर मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी लोकशाहीतील सहभाग यावर सादरीकरण केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *