अमिताभ बच्चन यांच्या पूर्वपरवानगीशिवाय त्यांचा आवाज, नाव, छायाचित्र वापरणे बेकायदा
दिल्ली उच्च न्यायालयाचा अंतरिम आदेश
वृत्तसंस्था
नवी दिल्ली दि.२५ :- ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या पूर्वपरवानगीशिवाय त्यांचा आवाज, नाव आणि छायाचित्र वापरणे बेकायदा असल्याचा अंतरिम आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने गुरुवारी दिला. दस्तुरखुद्द बच्चन यांनी यासंदर्भात याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केली होती. अनेक जाहिरात संस्था आपली पूर्वपरवानगी न घेता जाहिरातींमधून आपला आवाज, नाव आणि छायाचित्रचा वापर करतात. हे अनेक दिवसांपासून सुरू आहे. असे करणे आपल्या वैयक्तिक आणि प्रसिद्धी हक्काचे उल्लंघन असून त्याला प्रतिबंध करण्यात यावा, अशी मागणी बच्चन यांनी याचिकेत केली होती.
समाज माध्यमांतून एका लॉटरीची जाहिरात केली जात असून त्या जाहिरातीत माझी कोणतीही पूर्वपरवानगी न घेता माझ्या आवाजाचा आणि छायाचित्राचा वापर करण्यात आला आहे. इतकेच नाही तर त्या जाहिरातीत ‘केबीसी’च्या बोधचिन्हाचाही वापर करण्यात आला असल्याचेही याचिकेत म्हटले आहे.
यावर न्या. नयन चावला यांनी बच्चन यांच्या पूर्वपरवानगीशिवाय त्यांचा आवाज, नाव आणि छायाचित्र याचा वापर करु नये, असा अंतरिम आदेश या याचिकेवर दिला. तसेच बच्चन यांच्या पूर्वपरवानगीशिवाय त्यांचा आवाज, नाव आणि छायाचित्र याचा वापर होत असलेल्या जाहिराती हटविण्यात याव्यात असेही आदेश दिले. बच्चन यांच्यावतीने ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांनी काम पाहिले.