मुंबई आसपास संक्षिप्त
‘बोलीभाषा एकांकिका स्पर्धा
मुंबई- सुप्रिया प्रॉडक्शन्स, व्हिजन व्हॉईस एन ऍक्ट ही संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ९ ते ११ जानेवारी २०२३ दरम्यान ‘बोलीभाषा एकांकिका स्पर्धे’आयोजित करण्यात आली आहे. जानेवारीच्या तिसर्या आठवड्यात अंतिम फेरी होणार आहे.
नाटककार गंगाराम गवाणकर यांच्या संकल्पनेला नाट्यनिर्माते गोविंद चव्हाण यांनी मूर्त रुप दिले. रोख रक्कम, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र असे पारितोषिकांचे स्वरूप आहे. स्पर्धेचे नियम व प्रवेश अर्ज www.supriyaproduction.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
संगीत महोत्सवाचे आयोजन
मुंबई- दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे नुकतेच संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. पंडित नयन घोष यांच्या सतार वादनाने महोत्सवाच्या पहिल्या दिवसाचा प्रारंभ झाला. दुसरा दिवस गाजवला तो किराणा घराण्याचे सध्याचे आघाडीचे कलाकार पंडित जयतीर्थ मेवुंडी यांनी. महोत्सवाची सांगता जयपूर अत्रोली घराण्याच्या ज्येष्ठ गायिका विदुषी श्रृती सडोलीकर-काटकर यांच्या गायनाने झाली.
नामफलक उदघाटन
मुंबई- कॉ. गुलाबराव गणाचार्य यांच्या ४९ व्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने त्यांच्या नावाच्या एलईडी नामफलकाचे उदघाटनन ज्येष्ठ पत्रकार राही भिडे यांच्या हस्ते चिंचपोकळी येथे झाले. यावेळी माजी नगरसेवक सुनील गणाचार्य, मुंबई काँग्रेसचे चिटणीस अनिल गणाचार्य, संयुक्त महाराष्ट्र लढा स्मृति मंडळाचे अध्यक्ष भाऊ सावंत आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
खारकोपर- उरण दुसरा टप्पा पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये सुरू
मुंबई- नेरुळ-बेलापूर-उरण उपनगरीय रेल्वे मार्गावरील खारकोपर-उरण हा दुसरा टप्पा फेब्रुवारी २०२३ पासून प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. या टप्प्याचे ८५ टक्के काम पूर्ण झाले आहे. खारकोपर ते उरण उपनगरीय मार्गावर गव्हाण, रांजणपाडा, न्हावाशेवा, द्रोणागिरी, उरण ही स्थानके आहेत.
—–