वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानाच्या शतकोत्तर हीरक महोत्सवाची सांगता
प्रवेश तिकीट आता ऑनलाईन
(मुंबई आसपास प्रतिनिधी)
मुंबई दि.१८ :- वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयाचा शतकोत्तर हीरक महोत्सव सांगता सोहळा शुक्रवारी पार पडला. प्राणिसंग्रहालयाचे प्रवेश तिकीट आता ऑनलाईन काढता येणार असून ऑनलाईन तिकिट प्रणालीचा शुभारंभही यावेळी करण्यात आला. प्राणिसंग्रहालयाचे मनोगत व्यक्त करणारा ‘मी राणीबाग बोलतेय’ हा माहितीपट आणि प्राणिसंग्रहालयाच्या ‘व्हर्च्युअली वाइल्ड’ या मालिकेचा शेवटचा भाग सादर करण्यात आला. केटी बागली आणि मेधा राजाध्यक्ष लिखित ‘निघाली प्राण्यांची मजेदार वरात’ या मराठी पुस्तकाचे आणि इंग्रजी अनुवादाचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले. प्राणिसंग्रहालयात हम्बोल्ट पेंग्वीनच्या तीन नव्या पिलांचे आगमन झाले असून त्यांचे फ्लॅश (नर), बिंगो (नर), एलेक्सा (मादी) असे नामकरण करण्यात आले आहे.
प्राणिसंग्रहालयातील त्रिमितीय प्रेक्षागृहामध्ये झालेल्या कार्यक्रमास अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीवकुमार, महानगरपालिका उपआयुक्त (उद्याने) किशोर गांधी, प्राणिसंग्रहालयाचे संचालक, डॉ. संजय त्रिपाठी, संबंधित अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
दरम्यान’वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय’ म्हणजेच पूर्वीचे ‘व्हिक्टोरिया गार्डन’ चे उदघाटन लेडी कॅथरीन फ्रिअर यांच्या हस्ते १९ नोव्हेंबर १८६२ रोजी भायखळा येथे करण्यात आले होते. सदर उद्यान महानगरपालिकेकडे सुपूर्द झाल्यानंतर महानगरपालिकेने एक सार्वजनिक उद्यान म्हणून उद्यानाची संपूर्ण जबाबदारी व देखभालीचे काम स्वीकारले.