राहुल गांधी यांचे आरोप मूर्खपणाचे – रणजित सावरकर यांचे प्रतिपादन
(मुंबई आसपास प्रतिनिधी)
मुंबई दि.१९ :- काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ मोहीमेत राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यावर केलेले बेछूट आरोप मुर्खपणाचे आहेत, असे प्रतिपादन स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष आणि सावरकरांचे नातू रणजित सावरकर यांनी केले. दादर पश्चिम येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत सावरकर बोलत होते. सावरकर यांच्या पत्रात अखेरच्या ओळी दाखवून जे वक्तव्य राहुल गांधी यांनी केले ते गूगलसारखे ट्रानस्लेशन करीत वाचून दाखविले. मुळात त्या काळात तशी लिखाणाची पद्धत होती. त्यांच्या आजोबांनी आणि महात्मा गांधी यांनीही तसेच लिहिले आहे, याचा अर्थ काय? इतकेच नव्हे तर जवाहरलाल नेहरू यांनी तर देशाच्या स्वातंत्र्यासंबंधात तत्कालिन व्हॉईसरॉय माऊंट बॅटन, त्यांच्या पत्नी एडविना माऊंट बॅटन यांच्यासह सिमला येथे जाऊन नंतर फाळणीला त्यांनी ज्या प्रकारे मान्यता दिली, तो देशद्रोहच नाही का?, असाही सवालही सावरकर यांनी केला.
एडविना माऊंट बॅटन आणि जवाहरलाल नेहरू यांच्यातील संबंधांबद्दल माऊंटबॅटन यांच्या कन्या पामेला यांनी लिहिलेल्या पुस्तकातीलही संदर्भही त्यांनी यावेळी दिले. जवाहरलाल नेहरू एडविना माऊंट बॅटन यांना दररोज रात्री पत्रे लिहून दिवसभरातील घटना, निर्णय यांची माहिती देत होते, हा देशद्रोहन नाही का? याची माहितीही राहुल गांधी यांनी घ्यावी, असे त्यांनी सांगितले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना पेन्शन दिले जात होते, या संबंधातील आरोपालाही त्यांनी फेटाळून लावले.
राहुल गांधी यांच्या आरोपांसंबंधातील दिलेल्या आपल्या साऱ्या प्रत्युत्तरांना कागदोपत्री असणारे संदर्भही यावेळी रणजित सावरकर यांनी पुराव्यादाखल सादर केले. यात गांधींचे वसाहत सचिवांना पत्र, द पीनल सेटलमेंट इन द अंदमान, गांधी यांनी जालिनवाला बागेसंबंधातील केलेले वक्तव्य, जवाहरलाल नेहरू इन नाभा जेल, सावरकरांचा निर्वाह भत्तासंबंधात य. दि. फडके यांच्या पुस्तकातील संदर्भ, गांधी आणि अन्य काहींच्या भत्त्याचा ताळेबंद- तपशील, सर्व राजबंदींना सोडण्यात यावे यासाठी सावरकरांच्या मागणीसंबंधातील केंद्रीय गृहखात्याचे १९१८ चे पत्र, जवाहरलाल नेहरू यांनी लिहिलेले १९४८ चे ब्रिटिशांना लिहिलेले पत्र, गांधीनी भारतातील इंग्रजांना लिहिलेले पत्र, मोतिलाल नेहरू यांचे जवाहरलाल नेहरू यांना पत्र, संरक्षण मंत्र्यांचे पत्र आादी पुस्तकातील कात्रणे, पत्रांच्या प्रतिलिपी यांचा समावेश आहे.