माटुंगा येथील गुरुवायूर मंदिराचे शंभराव्या वर्षांत पदार्पण
(मुंबई आसपास प्रतिनिधी)
मुंबई दि.१९ :- माटुंगा येथील आस्तिक समाजाच्या कोचू (लहान) गुरुवायूर मंदिराने शंभराव्या वर्षांत पदार्पण केले आहे. त्यानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत मंदिरात ‘महाद्रव्यवर्ती सहस्त्र ब्रह्मकलश अभिषेक’ महोत्सवाला शुक्रवारी सुरुवात झाली. येत्या २५ नोव्हेंबरपर्यंत मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
गुरुवायूर केरळ येथील श्री कृष्ण मंदिराचे मुख्य तंत्री पी सी दिनेशन नम्बुदिरीपाद, आस्तिक समाज देवस्थानचे अध्यक्ष वेंकटरमण, सचिव पी व्ही रामास्वामी, विश्वस्त सी एस परमेश्वर आणि अनेक भाविक यावेळी उपस्थित होते.
ज्येष्ठ पार्श्वगायक शंकर महादेवन यांनी यावेळी कृष्णभजने सादर केली. यावेळी राज्यपालांच्या हस्ते अध्यक्ष वेंकटरमण, सचिव पी व्ही रामास्वामी, कोषाध्यक्ष गोविंद कुट्टी, उपाध्यक्ष सी व्ही सुब्रमण्यम, विश्वस्त रामकृष्ण, सी एस परमेश्वर, मुरली, कल्याण कृष्णन, श्रीकुमार व पद्मनाभन यांचा सत्कार करण्यात आला.