मुंबई आसपास संक्षिप्त
‘औरंगाबाद शहर पाणी पुरवठा योजनेला गती द्या’
मुंबई दि.१९ :- औरंगाबाद शहरासाठीची पाणी पुरवठा योजना, शहरात साकारण्यात येणारे दिवंगत बाळासाहेब ठाकरे स्मारक तसेच पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यानाचे पुनरूज्जीवन तसेच जिल्हयातील,पैठण मतदार संघातील विविध विकास कामे आणि प्रकल्पांना गती द्यावी, असे आदेश श मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी येथे दिले. औरंगाबाद जिल्हा आणि पैठण मतदार संघातील विविध विकास कामांबाबत मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री राज्य अतिथीगृहात झालेल्या बैठकीत शिंदे यांनी हे आदेश दिले.
ऑक्टोबरमध्ये २१ हजार बेरोजगारांना रोजगार
मुंबई – कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांद्वारे राज्यात विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यांमध्ये ऑक्टोबर २०२२ मध्ये २१ हजार ५२५ बेरोजगार उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात आला, अशी माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. बेरोजगार उमेदवार आणि उद्योजक यांच्यामध्ये सांगड घालण्यासाठी विभागाने https://rojgar.mahaswayam.gov.in हे वेबपोर्टल सुरु केले आहे. नोकरीइच्छूक उमेदवारांनी या वेबपोर्टलवर नोंदणी करुन याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही लोढा यांनी केले.
पर्यटकांसाठी प्रतापगड पुन्हा सुरू
मुंबई – प्रतापगड पर्यटकांसाठी शुक्रवारपासून पुन्हा सुरू करण्यात आला. गडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजल खान कबरीवरील अतिक्रमण हटवण्याची मोहीम गेल्या आठवड्यापासून सुरू होती. त्यामुळे परिसरात जमाबंदी लागू करण्यात आल्याने प्रतापगडावर जाण्यासाठी पर्यटककांना बंदी घालण्यात आली होती. ही बंदी आता उठविण्यात आली आहे.
दोनशे प्राध्यापकांच्या रिक्त जागा भरण्यास मान्यता
मुंबई – राज्यातील विविध विद्यापीठांमधील आणखी सुमारे २०० प्राध्यापकांच्या रिक्त जागा भरण्यास मान्यता दिली जाणार आहे मुंबई पुणे विद्यापीठांमध्ये प्राध्यापकांच्या सर्वाधिक रिक्त जागा आहेत. राज्यातील १५ अकृषी आणि अभिमत विद्यापीठांमधील ६५९ प्राध्यापकांच्या रिक्त जागा भरण्यास राज्य शासनाने नुकतीच मंजुरी दिली.
उद्योजक डॉक्टर मधुसूदन खांबेटे यांचे निधन
ठाणे – लघु उद्योजकांची संघटना असलेली ‘टिसा’ आणि ‘कोसिआ’चे संस्थापक डॉक्टर मधुसूदन खांबेटे यांचे शुक्रवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले ते ९२ वर्षांचे होते.