विनाअनुदानित शाळांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अनुदानाचा २० टक्के टप्पा देणार
राज्य शासनाकडून १ हजार १६० कोटी रुपयांचा निधी मंजूर
(मुंबई आसपास प्रतिनिधी)
मुंबई दि.१८ :- महाराष्ट्रातील खासगी विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अनुदानाचा २० टक्के टप्पा देण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य शासनाकडून १ हजार १६० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. सुमारे ६० हजार शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार आहे.
हेही वाचा :- ‘सागरमाला’ योजनेअंतर्गत राज्यातील चार नव्या जेट्टी प्रकल्पांना मंजुरी
या निर्णयामुळे राज्यातील घोषित, अघोषित २९ टक्के आणि ४० टक्के अनुदान घेणाऱ्या तसेच त्रुटींची पूर्तता केलेल्या शाळांना पुढील टप्प्यातील वेतन अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
हेही वाचा :- स्वच्छ, सुंदर, आरोग्यदायी मुंबईसाठी सरकार प्रयत्नशील – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यातील अघोषित घोषित त्रुटीपात्र अशा विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित प्राथमिक, माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी गेल्या काही दिवसांपासून आझाद मैदानात आंदोलन सुरू केले होते. त्या पार्श्वभूमीवर शिक्षणमंत्री केसरकर यांनी या कर्मचाऱ्यांना अनुदानाचा पुढील टप्पा देण्याची घोषणा केली.