एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ६ टक्क्यांनी वाढ
आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे ३४ टक्के भत्ता
(मुंबई आसपास प्रतिनिधी)
मुंबई दि.१७ :- एस.टी. कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ६ टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे अर्थात ३४ टक्के महागाई भत्ता मिळणार आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याबाबतचा प्रस्ताव सरकारकडे पाठवण्यात आला होता. हा प्रस्ताव मंजूर झाला असून याबाबतचे पत्र राज्य सरकारने महामंडळाला पाठविले आहे. एसटी कर्मचाऱ्यांना यंदाच्या वेतनात वाढीव महागाई भत्ता देण्यात येणार असल्याचे एस.टी. महामंडळाकडून सांगण्यात आले.
एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच महागाई भत्ता दिला जातो. मात्र हा महागाई भत्ता वेळेवर मिळत नसल्याची एसटी कर्मचाऱ्यांची तक्रार होती. त्यामुळे महागाई भत्त्यात वाढ करण्याची मागणी एसटी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत होती.