कोपरी पुलावर गर्डर टाकण्याच्या कामामुळे वाहतुकीत बदल
ठाणे दि.१७ :- मुंबई-ठाणे दरम्यान कोपरी पुलावर गर्डर टाकण्याचे शनिवारी, १९ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री ११ ते रविवारी पहाटे ६ वाजेपर्यंत आणि रविवारी रात्री ११ ते सोमवार पहाटे ६ वाजेपर्यंत केले जाणार आहे. त्यामुळे नाशिक-मुंबई आणि मुंबई-नाशिक या दोन्ही मार्गिकांवरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. त्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले.
नाशिक-मुंबई महामार्गाने ठाणे शहरातून मुंबई पूर्व द्रुतगती महामार्गाने जाणाऱ्या जड-अवजड वाहनांना खारेगाव टोलनाका येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे. ही वाहने खारेगाव टोलनाका येथून डावीकडे वळण घेऊन गॅमन चौक-पारसिक रेतीबंदर, मुंब्रा बायपास मार्ग शिळफाटा उजवीकडे वळण घेऊन महापे मार्गे रबाळे-ऐरोली पुलाकडे जातील.
घोडबंदर मार्गाने ठाणे शहरातून मुंबईकडे जाणाऱ्या जड-अवजड वाहनांना माजीवडा पुलावर उजवे वळण घेऊन गोल्डन क्रॉस माजिवाडा पुलाखाली प्रवेश बंद करून ही वाहने तत्त्वज्ञान सिग्नल पुढे माजीवडा पुलावरून खारेगाव टोलनाका येथून डावीकडे वळण घेऊन गॅमन चौक-पारसिक रेती बंदर-मुंब्रा बायपास शिळफाटा उजवीकडे वळण घेऊन महापेमार्गे रबाळे-ऐरोली पुलामार्गे मुंबईकडे जातील.
हलक्या वाहनांसाठी पर्यायी मार्ग
नाशिक – घोडबंदरकडून मुंबईकडे जाणाऱ्या हलक्या वाहनांना तीन हात नाका येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे. यातील नाशिककडून येणारी वाहने साकेतकडून क्रिक नाका, शिवाजी चौकातून ठाणे-बेलापूर मार्गावर वळवण्यात येतील.
ठाण्यातून मुंबईकडे जाणारी हलकी वाहने जी. पी. कार्यालय, ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृह रोडने क्रिक रोडमार्गे ठाणे – बेलापूर रस्त्यावर वळवण्यात येतील. घोडबंदरकडील वाहने मॉडेला चेकनाकामार्गे मुंबईत जातील.
घोडबंदर रोडने व ठाणे शहरातून मुंबईकडे जाणारी वाहने तीन हात नाका, तुळजाभवानी मंदिर कट, सर्व्हिस रोडने कोपरी पूल, कोपरी सर्कल, बाराबंगला, फॉरेस्ट ऑफिस येथून मॉ. बाल निकेतन स्कूल आनंदनगर चेक नाकामार्गे मुंबईकडे जातील.