आठ प्रभागातील झोपडपट्ट्यांमध्ये गोवरचे सर्वात जास्त रुग्ण
२० हजार बालकांनी गोवर प्रतिबंधक लस घेतली नाही
आत्तापर्यंत ७ गोवरग्रस्त बालकांचा मृत्यू
मुंबई दि.१६ :- शहरातील २० हजार बालकांनी गोवर प्रतिबंधक लस घेतली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान गेल्या २० दिवसांत ७ संशयित गोवरग्रस्त बालकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत १४२ रुग्ण आढळून असून शहरातील आठ विभागांमधील झोपडपट्टय़ांमध्ये गोवर रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे.
यातील सर्वात जास्त म्हणजे ५० रुग्ण गोवंडीत तर त्याखालोखाल कुर्ला येथे ३१ रुग्ण आढळले. गोवरच्या रुग्णांची वाढती संख्या विचारात घेऊन कस्तुरबा रुग्णालयात तीन कक्ष सुरू करण्यात आले आहेत. यामध्ये ८३ खाटा, १० अतिदक्षता विभागातील खाटा आणि ५ कृत्रिम प्राणवायूची व्यवस्था असलेल्या खाटांचा समावेश आहे.
गोवंडी, मानखुर्द, कुर्ला भागातील रुग्णसंख्या लक्षात घेऊन गोवंडी शताब्दी रुग्णालयातही १० खाटा वाढविण्यात आल्या आहेत. गोवंडीतील प्रसुतीगृहातही रुग्णांना दाखल करण्याची व्यवस्था करण्यात आली असून, विलगीकरण कक्षही सुरू करण्यात आला आहे. कस्तुरबा आणि राजावाडी रुग्णालयात अनुक्रमे ४ आणि २ मृत्यू झाले तर एका बालकाचा मृत्यू घरी झाला. बहुतांश रुग्णांवर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू असून, पाच रुग्ण अतिदक्षता विभागात, तर एक रुग्ण कृत्रिम श्वसन यंत्रणेवर आहे.