गुजरातसाठी कॉंग्रेसचे ‘स्टार’ प्रचारक जाहीर
महाराष्ट्रातील चार नेत्यांचा समावेश
वृत्तसंस्था
नवी दिल्ली दि.१६ :- गुजरात विधानसभेसाठी येत्या १ आणि ५ डिसेंबररोजी होणा-या निवडणुकीसाठी काँग्रेसने ‘स्टार’ प्रचारकांची यादी जाहीर केली. यादीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, माजी अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी, सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्यासह देशभरातील प्रमुख नेत्यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील चार नेत्यांचा या ‘स्टार’ प्रचारकांमध्ये समावेश आहे.
एकूण ४० प्रचारकांची यादी निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, नसीम खान, रामकिशन ओझा यांचा तसेच राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल, मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग, कमलनाथ, हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भुपिंदरसिंग हुड्डा आदींचा समावेश आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीची मतमोजणी ८ डिसेंबरला होणार आहे.