मुंबई आसपास संक्षिप्त
महापालिका सेवा-सुविधांची माहिती एका टिचकीवर
मुंबई दि.१५ :- निवासी इमारतीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या लागणा-या विविध परवानग्या आणि सेवा-सुविधा यांची माहिती आता एका टिचकीवर मिळणार आहे. बृहन्मुंबई महापालिकने ‘इमारत ओळख क्रमांक’ अर्थात ‘मायबीएमसी बिल्डिंग आयडी’ (MyBMC ID) उपक्रम सुरु केला आहे. महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त आश्विनी भिडे यांच्या हस्ते याचा शुभारंभ करण्यात आला.
नवाब मलिक यांच्या जामिनावर २४ नोव्हेंबरला निर्णय?
मुंबई – कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील
मालमत्तांशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या नियमित जामीन अर्जावर विशेष न्यायालय २४ नोव्हेंबर रोजी निर्णय देण्याची शक्यता आहे. मलिक आणि अंमलबजावणी संचालनालयाचा (ईडी) तपशीवार युक्तिवाद ऐकल्यानंतर विशेष न्यायालयाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांनी मलिक यांच्या जामीन अर्जावरील निर्णय राखून ठेवला.
एक वर्षांच्या बालकाचा गोवरने मृत्यू
मुंबई – कस्तुरबा रुग्णालयात गोवरवर उपचार घेत असलेल्या एक वर्षाच्या एका बालकाचा सोमवारी मृत्यू झाला. या बालकाची प्रकृती चिंताजनक होती. गेल्या दोन महिन्यांपासून मुंबईत गोवरचे ८० हून अधिक रुग्ण आढळले आहेत. गोवरचा उद्रेक झालेल्या विभागात बृहन्मुंबई महापालिकेतर्फे विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत घरोघरी जाऊन गोवर संशयित रुग्णांचे सर्वेक्षणही करण्यात येत आहे.
बीडीडी चाळीतील रहिवाशांना दिलासा
मुंबई – राज्य सरकारने वरळी, ना. म. जोशी मार्ग आणि नायगाव येथील बीडीडी चाळीतील रहिवाशांना मोठा दिलासा दिला आहे. या प्रकल्पातील पात्र झोपडपट्टीवासीयांना आता २६९ चौरस फुटांऐवजी आता ३०० चौरस फुटांचे घरे देण्यात येणार आहे. यासंबंधीचा शासन निर्णय राज्य सरकारने जाहीर केला आहे.
काही भागातील पाणी पुरवठा बुधवारी बंद
ठाणे – महापालिकेच्या पिसे उदंचन केंद्र आणि टेमघर जलशुद्धिकरण केंद्र येथील उपकेंद्रात तांत्रिक दुरुस्ती तसेच ठाणे शहरातील विविध ठिकाणच्या जलवाहिनीची दुरूस्ती आणि स्थलांतरणाचे काम केले जाणार आहे. यामुळे ठाणे शहरातील काही भागात बुधवारी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. पाणी पुरवठा बंद राहणार असल्याने पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होईल. तरी नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.