ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे यांचे निधन
(मुंबई आसपास प्रतिनिधी)
मुंबई दि.१४ :- ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे यांचे विलेपार्ले येथील निवासस्थानी रविवारी रात्री निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी ज्योती, दोन विवाहित पुत्र, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
शेंडे यांनी मराठीसह अनेक हिंदी चित्रपटातही भूमिका केल्या होत्या. निवडुंग, मधुचंद्राची रात्र, जसा बाप तशी पोर आदी मराठी चित्रपटात त्यांनी काम केले होते. सरफरोश, गांधी, ईश्वर, नरसिंहा वास्तव हे त्यांचे गाजलेले हिंदी चित्रपट.
अभिनेता शाहरूख खान याच्या ‘ सर्कस’ या हिंदी मालिकेतही शेंडे यांची भूमिका होती. शाहरुख खानची ही पहिलीच दूरदर्शन मालिका. दूरदर्शनच्या राष्ट्रीय प्रसारणात ही मालिका सादर झाली होती. मुंबईतल्या पारशीवाडा येथील हिंदू स्मशानभूमीत शेंडे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
‘गाठभेट गप्पां’चे पहिले मानकरी सुनील शेंडे
ज्येष्ठ निवृत्त नाट्य व्यवस्थापक, रंगकर्मी अशोक मुळ्ये यांनी काही दिवसांपूर्वी ‘गाठभेट गप्पा’ उपक्रम सुरू केला होता. रंगभूमी, चित्रपटाच्या झगमगत्या दुनियेपासून वयोपरत्वे किंवा अन्य काही कारणाने दूर गेलेल्या ज्येष्ठ रंगकर्मींना त्यांच्या घरी जाऊन भेटणे आणि त्यांच्याशी गप्पा मारणे, असे त्याचे स्वरूप होते. उपक्रमाच्या शुभारंभाचे पहिले मानकरी ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे आणि दिवंगत सुनील शेंडे हे होते. अभिनेते प्रशांत दामले यांच्यासह मुळ्ये कर्वे आणि शेंडे यांच्या घरी गेले आणि त्यांच्यशी भरपूर गप्पा मारल्या होत्या.