बालदिनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री विद्यार्थ्यांमध्ये रमले!
मुलांनी विचारलेल्या प्रश्नांना मुख्यमंत्र्यांची उत्तरे
(मुंबई आसपास प्रतिनिधी)
मुंबई दि.१४ :-परळच्या क्षा.म.स. संस्थेच्या डॉ. शिरोडकर हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना सोमवारी बालदिनाची अनोखी भेट मिळाली. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: शाळेत आले, मुलांशी गप्पा मारल्या, त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना थेट उत्तरे दिली. डॉ. शिरोडकर विद्यालयाच्या सभागृहात केजी पासून ते माध्यमिक वर्गापर्यंतचे विद्यार्थी जमले होते. मुख्यमंत्री दुपारी सव्वा चारच्या सुमारास शाळेत आले. मुलांनी स्वत: तयार केलेली शुभेच्छापत्रे त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना दिली.
एक विद्यार्थी म्हणून मी आज इथे माझ्या शाळेतल्या आठवणी जागवायला आलो आहे. बालपण महत्वाचे असून त्यातला निरागसपणा सर्वांनी जपावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. एका विद्यार्थीने मुख्यमंत्र्यांना आई-बाबांचा, शिक्षकांच्या हातचा मार खाल्ला का? असा प्रश्ना विचारल्यावर मुख्यमंत्र्यांनी ठाण्यातील किसननगर मधील महापालिकेच्या शाळा क्रमांक २३ मधील आठवणी सांगितल्या. रघुनाथ परब नावाचे शिक्षक कसे शिक्षा करायचे याचा अनुभवही सांगितला.
तुम्ही दाढी का नाही करत? या प्रश्नावर मुख्यमंत्री म्हणाले, माझे गुरू धर्मवारी आनंद दिघे दाढी ठेवायचे त्यामुळे मी देखील दाढी ठेवायला सुरुवात केली. फक्त लग्नाच्या वेळेस दाढी काढल्याचे मुख्यमंत्र्यांनी हसत हसत सांगितले.मला पांढरा रंग आवडतो, असेही मुख्यमंत्र्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.