विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी ‘संकल्प संपूर्ण स्वास्थ्य’ कार्यक्रम
इंडियन ॲकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स- राज्य शासन यांचा करार
(मुंबई आसपास प्रतिनिधी)
मुंबई दि.१४ :- राज्य शासनाच्या विद्यार्थी समग्र विकास धोरणांतर्गत राज्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या सुदृढ आरोग्यासाठी ‘संकल्प संपूर्ण स्वास्थ्य’ कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. यासंदर्भात इंडियन ॲकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स (आयएपी) सोबत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने सामंजस्य करार केला.
शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत ‘रामटेक’ शासकीय निवासस्थानी हा करार करण्यात आला. शासनाच्यावतीने शालेय शिक्षण विभागाचे सचिव रणजितसिंह देओल आणि आयएपी संस्थेचे अध्यक्ष डॉ. उपेंद्र किंजवडेकर यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
याअंतर्गत योग्य व संतुलित पोषण, बाजारात अत्यंत मुबलकपणे उपलब्ध असणाऱ्या अन्न पदार्थांवरील वेष्टन वाचून योग्य/अयोग्य ओळखणे, मानसिक आणि भावनिक स्वास्थ्य, टीव्ही, मोबाईल यांचा मर्यादित वापर, शारीरिक व्यायाम, पुरेशी निद्रा, पर्यावरणाबाबत सजगता, व्यसनांपासून दूर राहण्याचे प्रभावी उपाय आदी उपयुक्त बाबींचे वयोपरत्वे प्रशिक्षणही दिले जाणार आहे.
या करारानुसार तीन ते नऊ आणि दहा ते अठरा या दोन वयोगटांमधील मुलामुलींची, शिक्षकांची आणि पालकांची कार्यशाळा, थेट संवाद आदी उपक्रम हाती घेण्यात येतील. हे उपक्रम आयोजित करण्याची जबाबदारी संपूर्णतः आयएपीची राहणार असून राज्य शासन यासाठी संपूर्ण सहकार्य करणार आहे.