‘ट्विटर’मध्ये पुन्हा नोकर कपात
नवी दिल्ली दि.१४ :- ट्विटर कंपनीत पुन्हा एकदा नोकरकपात करण्यात आली आहे. ट्विटरचे सर्वेसर्वा एलॉन मस्क यांनी याआधी कंपनीतील सुमारे ५० टक्के कर्मचाऱ्यांना नारळ दिला होता. आता दुस-या टप्प्यात साडेपाच हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आल्याचे वृत्त ‘सीएनबीसी’ने दिले आहे. यात सुमारे अडीचशे भारतीय कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
कर्मचाऱ्यांना पूर्वसुचना न देता काढून टाकण्यात आले असल्याचे सांगण्यात येते. याबाबत ट्विटरकडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. एलॉन मस्क यांनी ट्विटर खरेदी करताच सर्वात आधी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग अग्रवाल यांची त्यानंतर धोरण प्रमुख विजया गड्डे यांनाही डच्चू दिला होता.
खर्च कमी करण्यासाठी नोकरीवरुन काढून टाकण्यात येत असल्याचा ईमेल ट्विटरकडून कंत्राटी कर्मचाऱ्यांना पाठवण्यात आला असून १४ नोव्हेंबर हा नोकरीचा शेवटचा दिवस असल्याचे यात म्हटले आहे.