मुंबई आसपास संक्षिप्त
डोंबिवलीत उद्या किलबिल महोत्सव
डोंबिवली दि.१२ :- राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने डोंबिवलीत उद्या रविवारी (१३ नोव्हेंबर)
एक दिवसाच्या किलबिल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. डोंबिवली पश्चिमेतील बावन्न चाळ येथील रेल्वे मैदानावर दुपारी चार ते रात्री दहाच्या वेळेत हा महोत्सव होणार आहे. महोत्सवाचे उदघाटन रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते होणार असून महोत्सवात साहसी खेळ, जादुचे प्रयोग, चित्रकला, वाद्यवादन, कुंभारकाम, नृत्य सादरीकरण करण्यात येणार आहे. महोत्सवास बालगोपाळांना विनामूल्य प्रवेश आहे.
खासदार गजानन कीर्तिकर शिंदे गटात
मुंबई – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला. कीर्तिकर यांच्या प्रवेशामुळे शिंदे यांच्या पक्षातील खासदारांची संख्या आता १३ झाली आहे. मुंबईत प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिरात झालेल्या एका कार्यक्रमात कीर्तीकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला.
पहिली सरकारी जेनेटिक प्रयोगशाळा पुण्यात
मुंबई – महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे राज्यातील पहिली सरकारी जेनेटिक प्रयोगशाळा उभारण्यात आली असून पुढील महिन्यात ती सुरू होणार आहे. ही लॅब पुण्यातील शिवाजीनगर येथील डॉक्टर घारपुरे मेमोरियल बंगल्यात असणार आहे. गर्भवती महिलेच्या पोटातील बाळाला अनुवंशिक कर्करोग किंवा अन्य कोणत्याही प्रकारचा कर्करोग आहे का? याची तसेच इतर आजारांचे निदान बाळ जन्माला येण्यापूर्वी जेनेटिक चाचणीद्वारे या प्रयोगशाळेत करता येणार आहे.
आमदार जितेंद्र आव्हाड यांना अटक
ठाणे – येथील विवियाना मॉलमध्ये ‘हर हर महादेव’ या चित्रपटाचा खेळ बंद पाडून एका प्रेक्षकाला मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी शुक्रवारी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह अकरा जणांना अटक केली.
कोकणातील शिधावाटप दुकानात आता इंटरनेट
मुंबई – कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील खेडेगावांतील शिधावाटप दुकानांमध्ये इंटरनेट- वायफायची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे या दुकानाच्या परिसरात येऊन लोकांना माफक दरात इंटरनेट वापरता येणार आहे.