मुंबईत गोवरची साथ
घरोघरी जाऊन संशयित रुग्णांचे सर्वेक्षण
गोवर संशयित तीन रुग्णांचा मृत्यू
(मुंबई आसपास प्रतिनिधी)
मुंबई दि.११ :- मुंबईमध्ये गोवरची साथ आली असून सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यांपासून गोवर आजाराचा संसर्ग वाढल्याचे समोर आले आहे. एकूण ८४ रुग्णांची नोंद झाली असून गोवर संशयित तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. बृहन्मुंबई महापालिका आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत घरोघरी जाऊन गोवर संशयित रुग्णांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. गोवर हा आजार प्रामुख्याने लहान मुलांना होतो.
देवनार, गोवंडीचा भाग असलेल्या एम पूर्व विभागात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. गोवंडी परिसर विभागात एकूण ६९,२१८ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले. गोवंडीत घराघरापर्यंत पोहोचून गोवर प्रतिबंधक लसीकरणाची मोहीम राबवली जात आहे. गुरुवारी १३० मुलांना गोवर प्रतिबंधक लस देण्यात आली. यामध्ये नऊ महिने आणि १६ महिन्यांची मुले आणि आठ गर्भवती स्त्रियांचाही समावेश आहे. गोवरच्या रुग्णांना ‘अ’ जीवनसत्त्वाच्या गोळय़ा दिल्या जात असून लसीकरण झाले नसेल तर लसीकरणही केले जात आहे. सर्वेक्षणातील एकूण गोवर रुग्णांच्या संख्येपैकी सुमारे १० टक्के बालके अर्धवट लसीकरण झालेली आणि २५ टक्के बालके लसीकरण न झालेली आढळून आली आहेत.
गोवर व रुबेला या आजाराच्या लसीची पहिली मात्रा बालकास नऊ महिने पूर्ण झाल्यावर आणि दुसरी मात्रा १६ महिने पूर्ण झाल्यावर देण्यात यावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे. दोन्ही मात्रा बृहन्मुंबई महानगरपालिकेची आरोग्य केंद्रे, दवाखाने, सर्वसामान्य रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालयात मोफत उपलब्ध आहेत.
गोवर या आजारामध्ये बालकास ताप येऊन सर्दी, खोकला व अंगावर लालसर पुरळ येते. अर्धवट व लसीकरण न झालेल्या बालकांमध्ये या आजारामुळे पुढे होणारी गुंतागुंत ( फुप्फुसदाह, अतिसार, मेंदूचा संसर्ग) गंभीर स्वरूपाची असू शकते. गर्भवती स्त्रीला गोवरचा संसर्ग झाल्यास गर्भातील बाळामध्ये विकृती निर्माण होऊ शकते.