वयाची १८ वर्षे पूर्ण होण्याआधीच मतदार म्हणून नोंदणी करता येणार
मुंबई दि.११ :- आतापर्यंत १ जानेवारी किंवा तत्पूर्वी वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्या नागरिकांना मतदारयादीत नोंदणी करता येत होती. मात्र, आता २०२३ पासून जानेवारी, एप्रिल, जुलै आणि ऑक्टोबर या महिन्यांच्या १ तारखेला किंवा तत्पूर्वी वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या युवकांना मतदार म्हणून नोंदणी करता येणार आहे. जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी ही माहिती दिली.
भारत निवडणूक आयोगाने मतदारयाद्या सुधारित करण्यासाठीचा ‘विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम २०२३’ हाती घेतला आहे. त्याअंतर्गत उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे जनजागृती प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. प्रभात फेरीच्या समारोपप्रसंगी जिल्हाधिकारी चौथरी बोलत होत्या.
१ जानेवारी २०२३ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण होत असलेल्यांची नवीन मतदार म्हणून नोंदणी करण्यात येणार असून १ ऑक्टोबर २०२३ पर्यंत वयाची १८ वर्षे पूर्ण होत असलेले युवक नवीन मतदार नोंदणीसाठी आगाऊ अर्ज करू शकणार आहेत. यामुळे युवकांना वयाची १८ वर्षे पूर्ण होताच मतदानाचा अधिकार प्रत्यक्ष स्वरूपात प्राप्त होईल, असेही त्यांनी सांगितले.