राज्यात लवकरच स्वतंत्र अपंग कल्याण विभागाची निर्मिती
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
मुंबई दि.११ :- राज्यात लवकरच स्वतंत्र अपंग कल्याण विभागाची निर्मिती करण्यात येणार असून मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत अपंगांच्या विविध प्रश्नांवर महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
गाव-खेड्यांमधील अपंगांना शासकीय योजनांचा त्वरित लाभ मिळावा यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये अपंग भवन तथा जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र उभारण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
एसटी बस आणि बेस्ट बसमधून प्रवास करत असताना अपंगांना दिलेले वैश्विक ओळखपत्र ग्राह्य धरले जात नसल्याने त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. ही अडचण दूर करण्यासाठी अपंगांचे वैश्विक ओळखपत्र एसटी आणि बेस्ट बसने ग्राह्य धरावे, असे आदेशही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.