सारस्वत कॉलनीतील श्री विवेकानंद सहकारी गृहनिर्माण संस्थेचा सुवर्ण महोत्सव
१२ आणि १३ नोव्हेंबर रोजी कार्यक्रमांचे आयोजन
(डोंबिवली आसपास प्रतिनिधी)
डोंबिवली दि.०९ :- डोंबिवलीतील सारस्वत कॉलनीतील श्री विवेकानंद सहकारी गृहनिर्माण संस्था सुवर्ण महोत्सव साजरा करत असून यानिमित्ताने येत्या १२ आणि १३ नोव्हेंबर रोजी सहकारी संस्थेच्या पटांगणात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
आपले स्वतःचे घर नाही तर कमीत कमी एखादी छोटीशी सदनिका आपल्या हक्काची असावी, अशी इच्छा प्रत्येकाची असते. काही मध्यमवर्गीयांनी १९७१ यावर्षी एकत्र येऊन श्री विवेकानंद सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित स्थापन केली आणि १९ सप्टेंबर १९७१ रोजी अधिकृत नोंदणी केली. या संकुलात आज १७ इमारतींमध्ये ४०४ सभासद स्वतःच्या नावावर असलेल्या सदनिकेत गुण्यागोविंदाने राहत आहेत.
ही सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापनेचा सुवर्ण महोत्सव साजरा करत असून त्यात सर्वांचा सहभाग आहे. सुवर्ण महोत्सवाच्चा निमित्ताने धार्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याची जबाबदारी संस्थेच्या कार्यकारिणी आणि तरुण मुला-मुलींनी उचलली आहे. सभासदांना सहकार कायदा व त्या अनुषंगाने येणारे विषय, त्यात सभासदांची स्वतःच्या सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या प्रति असलेली जबाबदारी याबद्दल विशेष प्रशिक्षण शिबिरही आयोजित करण्यात आले आहे. संस्थेतील ज्येष्ठ नागरिक (वय ७५ च्या वर) आणि संस्था उभारणीत ज्यांनी विशेष योगदान दिले त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याच्यासाठी अशा व्यक्तींचा खास सन्मान केला जाणार आहे.
मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार राजू पाटील, नगरसेविका खुशबू चौधरी, माजी आमदार जगन्नाथराव पाटील, कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त, डोंबिवलीचे पोलीस आयुक्त, सहकारी संस्था रजिस्टार, विविध बँकांचे पदाधिकारी/ संचालक, चित्रपट दिग्दर्शक- निर्माते रवी जाधव, गीतकार संदीप खरे, संगीतकार सलील कुलकर्णी, संस्था उभारणीत महत्त्वाचे योगदान देणारे नाखे कुटुंबीय आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत.