वर्धा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांची निवड
(मुंबई आसपास प्रतिनिधी)
मुंबई दि.०९ :- वर्धा येथे होणाऱ्या ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांची निवड करण्यात आली. मराठी साहित्य भाषा आणि मराठी संस्कृती यांची अभिवृद्धी कशी होईल याचा विचार करण्याचा हा काळ आहे साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी झालेले निवड हा विचार करण्यासाठी मला मिळालेली संधी आहे अशी प्रतिक्रिया न्यायमूर्ती चपळगावकर यांनी व्यक्त केली.
येत्या तीन ते पाच फेब्रुवारी या कालावधीत वर्धा येथे हे संमेलन भरणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची निमंत्रक संस्था असलेल्या विदर्भ साहित्य संघाने अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ लेखक आणि विचारवंत सुरेश द्वादशीवार यांच्या नावाचा प्रस्ताव पाठवला होता.
अन्य घटक संस्थांकडूनही काही नावे सुचविण्यात आली होत अखेर चपळगावकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. भारतीय स्वातंत्र्यलढा ते हैदराबाद मुक्तिसंग्राम संदर्भातील न्यायमूर्ती चपळगावकर यांचे लेखन महत्त्वपूर्ण आहे. चपळगावकर यांनी विविध विषयांवर २७ पुस्तके लिहिली असून पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावरील चरित्रात्मक पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे.