घाटकोपर आणि विक्रोळी रेल्वे स्थानकांदरम्यानचा जुना पूल पाडून केबल स्टेड उड्डाणपूल ऊभारणार
(मुंबई आसपास प्रतिनिधी)
मुंबई दि.०८ :- घाटकोपर आणि विक्रोळी रेल्वे स्थानकांदरम्यान ४५ वर्षे जुना असलेला उड्डाणपूल पाडून तीथे केबल स्टेड उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. याची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून हा पूल दीड ते दोन वर्षात बांधला जाणार आहे.
काही वर्षापूर्वी अंधेरी स्थानकाजवळील गोखले उड्डाणपुलाच्या झालेल्या दुर्घटनेनंतर रेल्वे मार्गावरुन जाणाऱ्या सर्व पुलांची ‘आयआयटी’मार्फत संरचनात्मक तपासणी करण्याचा निर्णय रेल्वे, राज्य शासन आणि मुंबई महानगरपालिकेकडून घेण्यात आला होता. अंधेरी आणि जवळपासच्या पश्चिम उपनगरातून येणाऱ्या वाहतुकीसाठी सुरळीत वाहतुक निर्माण होणार आहे. हा पूल घाटकोपर पूर्वेकडील पूर्व द्रुतगती मार्ग ते घाटकोपर पश्चिमेकडील लाल बहाद्दर मार्ग घाटकोपर अंधेरी लिंक रोडला जोडला जाणार आहे.
त्यात काही पुलांची संरचनात्मक दुरुस्ती, तर काही उड्डाणपुलांची पुनर्बांधणी सुचवण्यात आली. त्यानुसार मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील दहा उड्डाणपूल आणि एका भूमिगत रस्त्याच्या (रोड अंडर ब्रिज) पुनर्बांधणीचे काम हाती घेण्यात आले. हे काम बृहन्मुंबई पालिकेच्या मदतीने ‘एमआरआयडीसी’ करणार आहे. यामध्ये मुंबईतील दादर टिळक उड्डाणपूल, रे रोड उड्डाणपूल, भायखळा आणि सॅन्डहर्स्ट रोड दरम्यान असलेल्या ब्रिटीशकालिन पुलाबरोबरच अन्य पूल पाडून त्याऐवजी वांद्रे सागरी सेतुप्रमाणे केबल स्टेड पूल बांधले जाणार आहेत. प्रभादेवी आणि परळ रेल्वे स्थानकावरूनही दुमजली उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे.