वाहतूक दळणवळण

जोगेश्वरी टर्मिनस रेखाचित्र तयार करण्याचे काम सुरू

उभारण्यासाठी आठ महिन्यांपेक्षा जास्त कालावधी

(मुंबई आसपास प्रतिनिधी)

मुंबई दि.०८ :- मुंबई सेन्ट्रल, वांद्रे टर्मिनसवरील लांब पल्ल्याच्या गाड्यांचा भार हलका करण्यासाठी लवकरच जोगेश्वरीत टर्मिनस बांधण्यात येणार आहे. टर्मिनस उभारणीच्या कामासाठी आणखी आठ महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लागणार आहे. सध्या या टर्मिनसचे रेखाचित्र (डिजाईन) तयार करण्याचे काम सुरू आहे.

मध्य रेल्वेवर पनवेलमध्येही टर्मिनसच्या कामाला गती दिली जात आहे. यापूर्वीच छत्रपती शिवाजी महाराज, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस येथून, तर पश्चिम रेल्वेवर मुंबई सेन्ट्रल, वांद्रे टर्मिनस येथून मेल एक्स्प्रेस सुटतात. मात्र ही जागा अपुरी पडत असल्याने मुंबई उपनगरात आणि पश्चिम रेल्वेवरही आणखी एक टर्मिनस बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार जोगेश्वरीतील टर्मिनस प्रस्तावाला २०१९ मध्ये आणि त्यानंतर पुन्हा २०२१ रेल्वे बोर्डाकडून मंजुरी मिळाली.

मात्र करोना आणि अन्य काही तांत्रिक अडचणींमुळे प्रकल्प पुढे गेला नाही. हे काम पूर्ण होताच रेल्वे रूळ, फलाट इत्यादी कामे आणि प्रकल्प राबवण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती केली जाणार आहे. सल्लागाराच्या अहवालानंतर प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी निविदा काढली जाईल आणि त्यानंतर या टर्मिनसचे काम सुरु होणार आहे. या प्रकल्पासाठी ६८ कोटी ९९ लाख येणार असून पश्चिम रेल्वेवरील हे तिसरे टर्मिनस असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *