येत्या ८ नोव्हेंबरला खंडग्रास चंद्रग्रहण
मुंबईत संध्याकाळी खंडग्रास स्थितीतच चंद्र उगवणार
(मुंबई आसपास प्रतिनिधी)
मुंबई दि.०६ :- येत्या मंगळवारी ८ नोव्हेंबर रोजी कार्तिक पौर्णिमेच्या रात्री खग्रास चंद्रग्रहण होणार आहे. महाराष्ट्रातून खंडग्रास स्थितीत चंद्र उगवताना दिसणार असल्याचे ज्येष्ठ खगोल अभ्यासक आणि पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितले. मुंबईत संध्याकाळी ६ वाजून १ मिनिटांनी खंडग्रास स्थितीतच चंद्र उगवेल. साध्या डोळ्यानी चंद्रग्रहणाचे दृश्य पाहता येईल. चंद्रग्रहणास दुपारी २ वाजून ३९ मिनिटांनी प्रारंभ होईल.
दुपारी ३ वाजून ४७ मिनिटांपासून संध्याकाळी ५ वाजून १२ मिनिटांनी संपूर्ण चंद्रबिंब पृथ्वीच्या छायेत आल्याने खग्रास स्थिती होईल. संध्याकाळी ६ वाजून १९ मिनिटांनी चंद्रग्रहण सुटेल. देशाच्या पूर्व भागात खग्रास स्थितीतच चंद्र उगवताना दिसणार आहे. उर्वरित भारतातून खंडग्रास स्थितीतच चंद्र उगवताना दिसेल, अशी माहिती सोमण यांनी दिली. यानंतर भारतातून दिसणारे चंद्रग्रहण पुढच्या वर्षी २८ ॲाक्टोबर २०२३ रोजी होणार असल्याचेही दा. कृ. सोमण म्हणाले.