मुंबई आसपास संक्षिप्त
मराठी फलक नसलेल्या दुकान मालकांच्या विरोधात कारवाई
ठाणे दि.०२ :- दुकाने आणि व्यापारी संस्थांचे फलक मराठी (देवनागरी) भाषेत प्रदर्शित न करणाऱ्या जिल्ह्यातील १५३ दुकाने आणि व्यापारी आस्थापनांच्या मालकांविरोधात कामगार उपायुक्त कार्यालयातर्फे फौजदारी कारवाई करण्यात आली. १५ दुकान मालकांकडून सुमारे साडेतीन लाख रुपये दंड आकारण्यात आला. जिल्ह्यातील दुकाने आणि संस्थांनी आपले नामफलक मराठीमध्ये लावावेत, असे आवाहन कामगार आयुक्त सं. सं. भोसले यांनी केले आहे.
दिवाळीनिमित्त ‘एसटी’ला २१८ कोटींचा महसूल
मुंबई – दिवाळीनिमित्त महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने सोडलेल्या जादा गाडय़ा, दहा टक्के भाडेवाढ, प्रवाशांचा भरघोस प्रतिसाद यामुळे महामंडळाला २१८ कोटी रुपयांचा महसूल मिळाला. सर्वाधिक उत्पन्न धुळे विभागातून मिळाले आहे.
दिवाळीपूर्वी १३ कोटींच्या आसपास असलेले सरासरी दैनंदिन उत्पन्न दिवाळीमध्ये तब्बल २० कोटी रुपयांहून अधिक झाले. ३१ ऑक्टोबर रोजी सर्वाधिक २५ कोटी ४८ लाख उत्पन्न मिळाले.
ठाणे पोलिसांकडून विविध प्रकारची १७२ शस्त्रे जप्त
ठाणे – जानेवारी २०१९ ते सप्टेंबर २०२२ या कालावधीत ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीमधून पोलिसांनी विविध प्रकारची १७२ शस्त्रे आणि ५०० जिवंत काडतुसे, मॅगझिन जप्त केली. या शस्त्रांची किंमत सुमारे ५० लाखांच्या आसपास आहे. दाखल १३७ गुन्ह्यांमध्ये आरोपींची संख्या २२५ आहे.
‘म्हाडा’ घरांच्या सोडतीसाठीची अनामत रक्कम वाढविणार?
मुंबई – ‘म्हाडा’ घरांच्या सोडतीसाठीच्या अनामत रक्कमेत वाढ करण्याचा प्रस्ताव ‘म्हाडा’च्या विचाराधीन असल्याचे सांगण्यात येते. ‘म्हाडा’ प्राधिकरण आणि मुंबई मंडळाकडून याबाबत चाचपणी सुरू आहे. घराच्या एकूण रक्कमेच्या ५ ते १० टक्के अनामत रक्कम वाढविण्याचा विचार ‘म्हाडा’चा असल्याचे कळते.
अंबरनाथ जयहिंद बॅंकेला दोन पुरस्कार
अंबरनाथ – बँकिंग फ्रंटियर’ या प्रतिष्ठीत मासिकातर्फे २०२१-२०२२ या वर्षासाठी अंबरनाथ जयहिंद को. ऑपरेटीव्ह बँकेला उल्लेखनीय कामगिरीबद्दल ‘बेस्ट इनव्हेस्टमेंट इनिशिएटिव्ह’ आणि ‘बेस्ट ई पेमेंट इनिशिएटिव्ह’ या दोन विभागात पुरस्कार मिळाले आहेत. इंदूर येथे झालेल्या एका कार्यक्रमात माजी केंद्रीय उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते बँकेच्या पदाधिकाऱ्यांनी पुरस्कार स्वीकारला.
नवी मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन
नवी मुंबई – मोरबे धरणात यंदाच्या वर्षी ९३.७३ टक्के जलसाठा असून गेल्यावर्षी १ नोव्हेबर रोजी हा जलसाठा ९५.२७ टक्के होता. त्यामुळे नवीमुंबईकरांनी पाण्याचा वापर जपून करावा, असे आवाहन नवी मुंबई महापालिका प्रशासनाने केले आहे. पावसाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात आणि परतीच्या पावसात शहरात चांगला पाऊस झाला असला तरी मोरबे धरण क्षेत्रात पाऊस झाला नसल्याने यंदा मोरबे धरण यंदा १०० टक्के भरले नाही.
विनामूल्य नाट्य प्रशिक्षण शिबीर
कल्याण दि.०२ :- प्रसिद्ध दिगदर्शक सुनील परब यांच्यातर्फे विनामूल्य नाट्य प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते. १५ ते ६५ वयोगटातील प्रशिक्षणार्थी सहभागी झाले. डॉक्टर राजीव माळी, सत्यवान तळेकर यांच्या हस्ते शिबिराचे उदघाटन झाले. कल्याण येथील महिला मंडळाच्या सभागृहात झालेल्या या शिबिरात अभिनयाच्या विविध अंगांचे प्रशिक्षण देण्यात आले. शिबीराच्या समारोप सोहळ्यात सहभागी प्रशिक्षणार्थींनी एकपात्री प्रयोग आणि एकांकिका सादर केली. समारोप सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्ते विठोबा गावडे, पत्रकार कर्ण हिंदुस्तानी, ‘मनसे’चे शहर संघटक रुपेश चंद्रकांत भोईर उपस्थित होते.